उत्तम सदाकाळ

उत्तम सदाकाळ

Thursday, June 23, 2016


मेघराजा
धाव घे रे मेघराजा
वाट पाहू आता किती
धो धो बरस रे असा
चिंब होऊदे ही माती


खुरटला सारा चारा
गाईगुरे व्याकुळली
चिडीचिप झाले रान
नदी भासाने चळली


डोळे लावून आभाळी
बळी रानात पांगला
धीर सुटल्या जीवाने
फास झाडाला टांगला


अरे सोड तुझा ताठा
येई नाचत झिम्माड
तुझ्याविना दुनियेला
पड़े जगण्याचं कोडं


तुझ्या प्रेमळ स्पर्शाने
रान हिरवं होऊ दे
कर बळीला पेरता
जग सुखात राहु दे

*************
उत्तम सदाकाळ
9011016655

Thursday, January 28, 2016


खेळ 
दिस उगवे कष्टाचा
माझ्या कोवळया आभाळी
देई जगण्याची आस 
जरी दैन्य माझ्या भाळी

खेळ दावता दावता
बाप अर्ध्यावर गेला 
चतकोर घासासाठी 
खेळ नशिबाचा झाला 

दोन भावंडे लहान 
आई आजारी घरात 
घर चालवाया माझी 
रोज बाजारी वरात

ऊन तळपते माथी 
भूक आतडयांना जाळी
दोर काठयांना बांधुन
देह झुले अंतराळी 

तोल सावरते आता 
हाती घेवुनिया काठी 
डोंबा-याच्या नशिबात 
कुठे शाळा कुठे पाटी 
****************
 उत्तम सदाकाळ

Thursday, October 22, 2015


पाऊस

पाऊस
पाऊस पानातला
वाजतोय झिम्माड
टिपरी तालावर
झिंगलेय झाड

पाऊस रानातला
अवखळ अल्लड
घालतोय धिंगाणा
करतोय हुल्लड

पाऊस गावातला
घुमतोय कानात
धारांचे नक्षीकाम
तुडुंब अंगणात

पाऊस शेतातला
हिरवाकंच ओला
मोत्यांनी मढला
पाचूदार शेला

पाऊस मनातला
पापण्यांच्या दारी
सांजवेळी सजणा
दाटलाय उरी
*************
उत्तम सदाकाळ
मढ,जुन्नर
९०११०१६६५५