उत्तम सदाकाळ

उत्तम सदाकाळ

Saturday, September 26, 2015


    दु:ख 



कुठे उलथले ढग 
दिसे मोकळे आभाळ 
कुक्कु पुसल्या बाईचे 
जसे रांडके कपाळ 

ये ना धावून पावसा 

भुई कधीची गर्भार 

किती जाळशील जीव 

पेर केली रे दुबार 
मान टाकता कोंबानी 
पीळ जिव्हारी बसला 
भुई भेगाळली खोल 
राजा पुरता खचला 

डोळा दाटली उदासी 

जीव कापरा कापरा 

फास होण्याच्या भीतीने 

मनी घाबरे कासरा 
दोर बांधून फांदीला 
राजा रानात रडला 
शेतातल्या बाभळीच्या 
कंठी हुंदका अडला 

ओल हुंदक्याची खोल 

डोळे मातीचे भिजले 

दु:ख बळीचे पाहून 

तिचे काळीज थिजले 
नको अविचार करू 
राजा ऐक माझे थोडे 
दावे तोडून खुटयाचे 
बैल हंबरडा फोडे 
                   **************

उत्तम सदाकाळ 

९०११०१६६५५

No comments:

Post a Comment