उत्तम सदाकाळ

उत्तम सदाकाळ

Thursday, October 22, 2015


पाऊस

पाऊस
पाऊस पानातला
वाजतोय झिम्माड
टिपरी तालावर
झिंगलेय झाड

पाऊस रानातला
अवखळ अल्लड
घालतोय धिंगाणा
करतोय हुल्लड

पाऊस गावातला
घुमतोय कानात
धारांचे नक्षीकाम
तुडुंब अंगणात

पाऊस शेतातला
हिरवाकंच ओला
मोत्यांनी मढला
पाचूदार शेला

पाऊस मनातला
पापण्यांच्या दारी
सांजवेळी सजणा
दाटलाय उरी
*************
उत्तम सदाकाळ
मढ,जुन्नर
९०११०१६६५५

इच्छा

इच्छा
हे आरसपाणी रूप
तू मोहक मनमोही
हे हसणे कातिलाणे
मी माझा उरलो नाही

अशी जादू हवी हवी
धडधड नवी नवी
मी तुझ्यामध्ये गुंतावे
तू मोहक बेडी व्हावी

श्वासात तुझ्या सुगंधी
दरवळे माझा श्वास
डोळ्यात तुझ्या गही-या
हरवावे वेडा ध्यास

तुझी रेशमाची मिठी
रोमांचित माझी काया
माखावा कंपित ओठी
मदनाचा धुंद फाया

भेटीस नसावा खंड
क्षण हे कैद करावे
जगावे तुझ्याचसाठी
बाहूत तुझ्या मरावे
**********
उत्तम सदाकाळ
९०११०१६६५५

Saturday, September 26, 2015



    दु:ख 



कुठे उलथले ढग 
दिसे मोकळे आभाळ 
कुक्कु पुसल्या बाईचे 
जसे रांडके कपाळ 

ये ना धावून पावसा 

भुई कधीची गर्भार 

किती जाळशील जीव 

पेर केली रे दुबार 
मान टाकता कोंबानी 
पीळ जिव्हारी बसला 
भुई भेगाळली खोल 
राजा पुरता खचला 

डोळा दाटली उदासी 

जीव कापरा कापरा 

फास होण्याच्या भीतीने 

मनी घाबरे कासरा 
दोर बांधून फांदीला 
राजा रानात रडला 
शेतातल्या बाभळीच्या 
कंठी हुंदका अडला 

ओल हुंदक्याची खोल 

डोळे मातीचे भिजले 

दु:ख बळीचे पाहून 

तिचे काळीज थिजले 
नको अविचार करू 
राजा ऐक माझे थोडे 
दावे तोडून खुटयाचे 
बैल हंबरडा फोडे 
                   **************

उत्तम सदाकाळ 

९०११०१६६५५


                                                       जोडीदारा                                                                                जीवाच्या रे जोडीदारा 
साद घालू किती वेळा ? 
सांजवेळी भेटीसाठी 
जीव व्याकुळला भोळा 

सांज सरूनी काळोख 

दाटतोय काळाकुट्ट 

कुठवर लावू डोळा 

तुझी मोकळीच वाट 
आठवणींचा कल्लोळ 
रात्र रात्र जागवितो 
अश्रू टिपता टिपता 
पदर ओलाचिंब होतो 

नको तिष्ठ्वूस आता 

ये रे परतुनी घरा 

मना मिलनाची आस 

जीवाच्या रे जोडीदारा 




                             ************

उत्तम सदाकाळ 
                               ९०११०१६६५५

Friday, September 25, 2015






























      








विसर्जन 



मित्रा...आज बाप्पाला आणलेस तू घरात 
वाजत गाजत ...हर्षोल्हासात .

पण घरातील बापाला 


अनाथाश्रमात का पाठवलेस तू ..?

गुपचूप...



एखादी टाकावू वस्तू फेकून द्यावे तसे.
हि कुठली तुझी श्रद्धा ?


हि कुठली तुझी भक्ती?


मित्रा घरात बसविलेल्या बाप्पाच्या डोळ्यात डोकाव जरा 
मग  तुला दिसेल


तुझे सारे कर्म...



तुझी बेगडी भक्ती ...


अरे आज वाटतोयस तू पेढ्यांचा प्रसाद 
सा-या गावाला...मोठ्या अभिमानाने.

पण स्वत:च्या बापाला 


दोन घासासाठी तळमळवताना 

काहीच कसे वाटले नाही तुला..?

आज मोठ्या दिमाखात बाप्पासाठी

तू महागाचे मखर घेवून आलास.

अन तेंव्हा बापाला अंथरायला 

काय दिले होतेस तू ?


एक फाटके पोते..?


मित्रा हल्ली तुझ्या घरात बाप्पाला 

चुकल्यासारखे वाटतेय... 


अनाथाश्रमात धाय मोकलून रडणा-या 
तुझ्या बापासाठी 



गणपतीबाप्पाचेही काळीज तुटतेय...

घरात गणपतीबाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणा-या 
माझ्या मित्रा,



अनाथाश्रमात स्वतःच्या बापाचे विसर्जन करून 
अखेर काय साधलेस तू..?


           **************


             उत्तम सदाकाळ 


               9011016655




















































































































































धरण

धरणाने अजगरी 
घट्ट विळखा घातला 
किती सावरू मी आता 
त्यात पाऊस मातला 

डोळ्यादेखत बुडाली 

मायाळू ग काळी आई 

तिच्या संग सारं गेलं 

कशी व्हावी भरपाई 
पाणी शिरलं गावात 
ओलांडली गावकूस 
भाऊरायाच्या वाडयाचा 
लागेना गं मागमूस 

पेठ गिळली पाण्याने 

लुप्त सा-या खाणाखुणा 

पाणी भिडे कळसाला 

विठूराया दीनवाणा 
होतं घरटं बांधलं 
जमवून काडी काडी 
जळबंब केलं तेही 
आली नाही दया थोडी 

करा तुम्ही शेतमळे 

दया धरणाला दुवा 

आम्ही एका घासासाठी 

तुडवितो गाव नवा 
                         ********



                                    उत्तम सदाकाळ                                        ९०११०१६६५५